तळघर – एक रहस्यमय भयकथा

 

महाराष्ट्रातील एका गावात असलेला रहस्यमय आणि जुना ऐतिहासिक वाडा.
काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला हा जुना वाडा आपल्या भिंतींमध्ये अनेक रहस्ये आणि अनकही कहाण्या लपवून बसला होता.



माधवच्या हातात आलेल्या कागदांवर त्याची नजर बराच वेळ स्थिर होती. त्याने एकदा कागद वाचला, पुन्हा वाचला आणि मग तो बाजूला ठेवून समोर बसलेल्या मृणालकडे पाहिलं.


त्यांच्या आयुष्यात एवढा मोठा बदल इतक्या सहजपणे घडेल, याची दोघांनाही कल्पना नव्हती.


गावाकडे एक मोठा वाडा, त्याला लागून असलेली शेती, बाग आणि इतर काही मालमत्ता आता माधवच्या नावावर होणार होती. या सगळ्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली होती. अनेक वर्षांपासून बंद असलेला एक मोठा संसार आता त्यांच्या हाती आला होता.


मृणालने कागद उचलून पुन्हा एकदा पाहिले. एवढी मोठी मालमत्ता, तीही कोणतीही अपेक्षा नसताना मिळणं, ही गोष्ट तिच्यासाठी अजूनही अविश्वसनीय होती.


माधवच्या वडिलांचे चुलत भाऊ रघुनाथराव देशमुख यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. रघुनाथराव हे अविवाहित होते. त्यांना पत्नी किंवा मुलं नव्हती. माधवच्या वडिलांशी त्यांचे जवळचे कौटुंबिक संबंध होते. दोन्ही कुटुंबांत पूर्वीपासून येणं-जाणं होतं; मात्र काळानुसार ते कमी झालं होतं. रघुनाथरावांचं वय वाढत गेलं तसं त्यांचा स्वभाव अधिकच एकलकोंडा झाला होता. ते गावातील वाड्यात एकटेच राहत असत.


त्यांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काची प्रक्रिया सुरू झाली. जवळचे पात्र वारस म्हणून माधवच्या वडिलांकडे मालमत्ता आली. मात्र ते स्वतः वयस्कर असल्यामुळे त्यांनी ती मालमत्ता आपल्या मुलाच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाडा, शेती आणि इतर मालमत्तेची कागदपत्रं माधवच्या नावावर झाली होती.


माधव एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. पगार चांगला होता, पण शहरातील घरभाडं, मुलांची शाळा आणि रोजच्या खर्चात फारशी बचत होत नव्हती. स्वतःचं घर असावं, ही दोघांचीही इच्छा होती. पण त्यासाठी लागणारी मोठी रक्कम जमवणं त्यांना शक्य होत नव्हतं.


आता मात्र परिस्थितीच बदलली होती.


मृणाल आणि माधव यांचा संसार चौघांचा होता. त्यांची आठ वर्षांची मुलगी सायली आणि पाच वर्षांचा मुलगा रोहन. सायली अभ्यासात हुशार आणि स्वभावाने थोडी शांत होती. रोहन मात्र सतत काही ना काही खेळत असायचा. घरात त्याची धावपळ सुरूच असे.


माधवने नोकरी सोडून गावाकडे राहण्याचा विचार मांडला तेव्हा मृणालने लगेच होकार दिला नाही. शहरातील आयुष्याची तिला सवय झाली होती. मुलांची शाळा, ओळखीचे लोक आणि रोजचं ठरलेलं जग सोडून नव्या ठिकाणी जाणं सोपं नव्हतं. पण स्वतःचं घर, शेती आणि शांत परिसर यांचा विचार केला की तिच्याही मनात उत्सुकता निर्माण होत होती.


काही दिवसांनी त्यांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला.


माधवने नोकरीचा राजीनामा दिला. मुलांच्या शाळेची व्यवस्था केली आणि घरातील सामान बांधण्यास सुरुवात झाली. सायली आणि रोहनसाठी तर हा सगळ्यात आनंदाचा भाग होता. त्यांना मोठ्या घरात राहायला मिळणार होतं. अंगण, बाग आणि भरपूर जागा मिळणार होती.


त्यांच्या मनात त्या घराबद्दल अनेक कल्पना तयार झाल्या होत्या.


 सकाळपासूनच घरात लगबग सुरू होती. सामानाची गाडी आधीच रवाना झाली होती. माधवने स्वतःच्या गाडीत मृणाल आणि मुलांना बसवलं.


शहर मागे पडलं तसं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शेती दिसू लागली. काही ठिकाणी हिरवी पिकं वाऱ्यावर डोलत होती. मधूनच छोटी गावं, चहाच्या टपऱ्या आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले शेतकरी दिसत होते.


सायली खिडकीतून बाहेर पाहत होती. रोहन कधी तिच्याशी बोलत होता, तर कधी रस्त्यावरच्या गाड्या मोजत होता.


गावाच्या जवळ पोहोचल्यावर मुख्य रस्ता सोडून गाडी एका जुन्या मार्गाला लागली. दोन्ही बाजूंना मोठी झाडं होती. रस्त्याच्या एका बाजूला शेतं पसरली होती, तर दुसऱ्या बाजूला दूरवर काही घरांची छपरं दिसत होती.


थोडं पुढे गेल्यावर माधवने गाडी एका मोठ्या लोखंडी प्रवेशद्वाराजवळ थांबवली.

त्याने खाली उतरून दरवाजा उघडला.


आत गेल्यावर गाडी एका लांब दगडी रस्त्याने पुढे सरकली. दोन्ही बाजूंना जुन्या झाडांच्या रांगा होत्या. काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या होत्या. पानांतून येणारा उन्हाचा प्रकाश जमिनीवर वेगवेगळ्या आकारांच्या सावल्या तयार करत होता.


समोर वाडा दिसू लागला.


मोठ्या दगडी बांधकामाचा तो वाडा गावातील इतर घरांपेक्षा वेगळा होता. समोर उंच लाकडी दरवाजा, त्याच्या दोन्ही बाजूंना जाड भिंती आणि वरच्या मजल्यावर लांब लाकडी खिडक्या होत्या. भिंतींवर काळाच्या खुणा होत्या, पण बांधकाम अजूनही मजबूत दिसत होतं.


गाडी अंगणात थांबली.


माधव बाहेर आला. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. अनेक वर्षांनी तो या वाड्यात आला होता. लहानपणी वडिलांसोबत एक-दोन वेळा इथे आल्याचं त्याला आठवत होतं. त्या वेळी त्याला हे घर खूप मोठं वाटलं होतं. आज मात्र ते प्रत्यक्ष त्याच्या मालकीचं झालं होतं.


मृणाल गाडीतून उतरली. तिच्यासमोर पसरलेलं अंगण पाहून ती काही क्षण तिथेच थांबली.


अंगणाच्या मध्यभागी जुनं तुळशीवृंदावन होतं. त्याच्या एका बाजूला लाकडी खांबांचा व्हरांडा आणि दुसऱ्या बाजूला वरच्या मजल्यावर जाणारा रुंद जिना होता. अंगणाच्या पलीकडे अनेक खोल्यांचे दरवाजे दिसत होते.


मागच्या बाजूला जाणाऱ्या मार्गातून बागेचा हिरवागार भाग दिसत होता.


सायली आणि रोहन गाडीतून उतरले आणि घराच्या दिशेने धावले.


एवढ्या मोठ्या घरात त्यांना काय काय पाहायला मिळणार, याची त्यांना घाई झाली होती.


वाड्याच्या आतल्या खोल्या उंच छताच्या होत्या. लाकडी खिडक्यांमधून पुरेसा प्रकाश येत होता. काही खोल्यांमध्ये जुनं फर्निचर अजूनही व्यवस्थित ठेवलेलं होतं. एका खोलीत मोठं कपाट, दुसरीकडे लाकडी पलंग आणि एका कोपऱ्यात जुनं टेबल होतं.


काही खोल्यांमध्ये मात्र धूळ साचली होती. बंद खिडक्यांमुळे तिथे अंधार होता.


माधवने आधी मुख्य खोल्या उघडून घेतल्या. मृणालने घराची पाहणी केली. स्वयंपाकघर मोठं होतं. त्याला लागून धान्य ठेवण्याची खोली होती. वरच्या मजल्यावर तीन मोठ्या खोल्या आणि एक लांब व्हरांडा होता.


घराच्या मागच्या बाजूला गेल्यावर मृणालला बाग दिसली.


आंबा, पेरू, चिंच आणि जांभळाची जुनी झाडं होती. काही झाडांवर पक्ष्यांची घरटी होती. बागेच्या पलीकडे शेती सुरू होत होती. हिरव्या शेतांच्या पलीकडे दूरवर डोंगराची अस्पष्ट रेषा दिसत होती.


त्या परिसरात शहरासारखा आवाज नव्हता. वाहनांची गर्दी नव्हती, हॉर्न नव्हते. फक्त झाडांमधून वाहणारा वारा, पक्ष्यांचा आवाज आणि दूरवरून येणारी शेतातील माणसांची हाक ऐकू येत होती.


मृणालला ती जागा आवडली.


संध्याकाळपर्यंत सामानाची गाडीही आली. पुढचे काही दिवस घर लावण्यात गेले. वापरायच्या खोल्या स्वच्छ केल्या. फर्निचर जागेवर ठेवलं. स्वयंपाकघराची व्यवस्था झाली. मुलांच्या अभ्यासासाठी एक खोली तयार केली.


माधवने गावातील काही माणसांशी संपर्क साधला. शेतीची पाहणी केली. विहीर, मोटार आणि शेतातील कामांची माहिती घेतली. आधीपासून काम करणाऱ्या दोन माणसांनी त्याला शेतीची परिस्थिती समजावून सांगितली.


वाड्याच्या मागे असलेल्या बागेचीही त्याने पाहणी केली. अनेक झाडं जुनी होती. काहींची छाटणी करावी लागणार होती. पाण्याची व्यवस्था केली तर बाग पुन्हा चांगली फुलू शकत होती.


माधवला या कामात रस वाटू लागला.


---


काही दिवसांतच त्यांचा संसार नव्या घरात स्थिरावला.


सकाळी माधव लवकर उठून शेतावर जाऊ लागला. मृणाल घरातील कामं आवरून मुलांना शाळेसाठी तयार करत असे. शाळा गावातच होती. सुरुवातीला मुलांना नवीन वातावरणाची सवय व्हायला थोडा वेळ लागला, पण लवकरच त्यांनी तिथे मित्रमैत्रिणी बनवले.


सायलीला वाड्यातील मोठ्या खिडकीजवळ बसून अभ्यास करायला आवडायचं. दुपारी शाळेतून आल्यावर ती कधी अंगणात खेळायची, तर कधी बागेतल्या झाडांभोवती फिरत असे. रोहनचा मात्र जास्त वेळ अंगणातच जायचा. त्याला तिथे खेळण्यासाठी जागा कमी पडत नव्हती.


मृणालचीही गावात ओळख होऊ लागली. जवळच्या घरातील कमलाबाई तिच्याकडे अधूनमधून येत असत. कधी मृणाल त्यांच्याकडे जाई. गावातील बाजार, किराणा दुकान आणि इतर आवश्यक गोष्टींची तिला माहिती झाली.


संध्याकाळी माधव शेतावरून परतला की चौघंही कधी अंगणात बसत, तर कधी बागेत फेरफटका मारत. मुलं दिवसभराच्या शाळेतील गोष्टी सांगत. माधव शेतातील कामांची माहिती देत असे.


शहरातील धावपळीच्या आयुष्यापेक्षा हे जीवन बरंच वेगळं होतं.


रात्री जेवणानंतर घरात शांतता पसरत असे. बाहेर झाडांच्या पानांचा आवाज आणि कधीतरी दूरवरून येणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याशिवाय काहीच ऐकू येत नसे.


मृणालला या शांततेची सवय होऊ लागली होती.


घर मोठं असल्यामुळे साफसफाईला वेळ लागत असे. काही खोल्या अजूनही वापरात नव्हत्या. त्या तशाच बंद ठेवल्या होत्या. वरच्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये जुनं सामान होतं. त्याकडे लक्ष द्यायला तिला अजून वेळ मिळाला नव्हता.


वाड्यातील सगळं आयुष्य आता हळूहळू त्यांच्या सवयीचं होत होतं.


---


एके रात्री मृणालची झोप अचानक उडाली.


घरात शांतता होती. माधव तिच्या बाजूला झोपला होता. खिडकीतून बाहेरच्या झाडांच्या फांद्या हलताना दिसत होत्या.


तेवढ्यात घराच्या मागच्या बाजूने एक आवाज आला.


जणू काहीतरी जड वस्तू जमिनीवर आपटली होती.


मृणालने डोळे उघडून ऐकलं.


काही क्षण शांतता राहिली. मग पुन्हा तसाच आवाज झाला.


तिने माधवला हलकं उठवलं.


त्याने झोपेतच बाहेर लक्ष दिलं. आवाज पुन्हा आला नाही.


माधवने खिडकीतून बाहेर पाहिलं. बागेत अंधार होता. झाडांच्या सावल्या चंद्रप्रकाशात लांब पसरल्या होत्या.


त्याला काही दिसलं नाही.


"कदाचित एखादा प्राणी असेल," एवढंच म्हणून तो पुन्हा झोपला.


मृणालही काही वेळाने शांत झाली.


दुसऱ्या दिवशी सकाळी माधवने बागेत जाऊन पाहिलं. झाडाखाली काही सुकलेल्या फांद्या पडल्या होत्या. रात्रीच्या वाऱ्यामुळे त्या पडल्या असाव्यात, असं त्याला वाटलं.


त्याने त्याकडे लक्ष दिलं नाही.


---


एके दिवशी दुपारी सायली शाळेतून घरी आली तेव्हा मृणाल स्वयंपाकघरात काम करत होती.


सायलीने दप्तर ठेवलं आणि अंगणात खेळायला गेली. थोड्या वेळाने ती पुन्हा आत आली.


तिच्या हातात एक छोटी बाहुली होती.


"आई, ती बाई कुठे गेली?"


मृणालने काम थांबवलं.


"कोणती बाई?"


"इथेच होती. माझ्याशी खेळत होती."


मृणालने तिच्याकडे पाहिलं.


सायलीच्या चेहऱ्यावर खोटं बोलत असल्यासारखा भाव नव्हता. ती अगदी सहजपणे काहीतरी सांगत होती.


"कुठे खेळत होती?"


"अंगणात."


मृणाल तिच्यासोबत बाहेर आली. अंगणात कोणी नव्हतं. तुळशीवृंदावनाजवळ सायलीची खेळणी पडली होती.


"कुणी नव्हतं गं तिथे."


"होती ना. ती माझ्याशी बोलत होती."


"काय बोलत होती?"


सायली काही क्षण विचारात पडली. मग तिने खांदे उडवले.


"मला माहीत नाही."


मृणालने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. लहान मुलं खेळताना स्वतःशीच बोलतात, त्यांच्या मनात काल्पनिक मित्रही असतात. तिने याआधीही अशी मुलं पाहिली होती.


त्यामुळे तिने या गोष्टीला फार महत्त्व दिलं नाही.


---


वाड्यात राहायला येऊन आता महिना झाला होता.


घर ही आता व्यवस्थित लावलं होतं. शेतीचं कामही चांगलं सुरू होतं. माधवने गावातील लोकांशी चांगले संबंध निर्माण केले होते. मृणाललाही आता गावातील वातावरणाची सवय झाली होती.


तिने मग घरात पूजा ठेवण्याचं ठरवलं.


नवीन घरात संसार सुरू केला होता. त्यामुळे आता नातेवाईकांना बोलावून पूजा करावी अस तिने ठरवलं आणि तिने सगळ्यांना बोलावलं.


पूजेच्या दिवशी सकाळपासून वाड्यात लगबग सुरू झाली. 


दुपारपर्यंत पाहुणे यायला सुरुवात झाली.


नातेवाईक, शेजारी आणि गावातील काही ओळखीची माणसं यांच्यामुळे घर पुन्हा एकदा गजबजून गेलं. मुलंही खूप आनंदात होती. कधी कोणाच्या मागे फिरत होती, तर कधी अंगणात खेळत होती.


पूजा व्यवस्थित पार पडली. संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. रात्री उशिरापर्यंत पाहुण्यांच्या गप्पा सुरू होत्या.


हळूहळू करत दुसऱ्या दिवशी मग सगळे निघून गेले. मात्र माधवची एक आत्या थांबली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्याचं तिने ठरवलं होतं.


त्या रात्री सगळे झोपले.


मध्यरात्रीच्या सुमारास आत्याला तहान लागली. ती पाणी पिण्यासाठी उठली. घरात सगळीकडे शांतता होती. दिवाणखान्यातील मंद प्रकाश सोडला तर बाकी सर्वत्र अंधार होता.


पाणी पिऊन ती खिडकीजवळ आली.


खिडकीतून अंगणाचा बराचसा भाग दिसत होता. चंद्रप्रकाशात तुळशीवृंदावन आणि झाडांच्या सावल्या अस्पष्ट दिसत होत्या.


तेवढ्यात तिची नजर अंगणाच्या एका कोपऱ्यात गेली.


तिथे एक स्त्री उभी होती.


ती पाठमोरी होती. तिचे लांब केस पाठीवर पसरलेले होते. अंगावर फिकट रंगाचं वस्त्र होतं.


ती अगदी निश्चल उभी होती.


आत्याला क्षणभर वाटलं, घरातील एखादी स्त्री बाहेर आली असेल. पण या वेळी अंगणात कोण उभं राहील?


तिने पुन्हा नीट पाहिलं.


ती स्त्री अजूनही तिथेच होती.


आत्याने मागे वळून खोलीच्या दिशेने पाहिलं. काही क्षणांनी पुन्हा बाहेर नजर टाकली.


आता तिथे कोणीच नव्हतं.


दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मृणालला विचारलं.


"काल रात्री घरात कोणी बाई आली होती का?"


मृणालने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं.


"नाही तर. का?"


आत्याने रात्री पाहिलेल्या स्त्रीबद्दल तिला सांगितलं.


मृणालच्या चेहऱ्यावर थोडी काळजी दिसली.


"कदाचित बाहेरून कुणी गेलं असेल. अंगणात प्रकाश कमी होता ना."


आत्याने काही उत्तर दिलं नाही.


दुसऱ्या दिवशी ती आपल्या गावी निघून गेली.



पूजेनंतर काही दिवस मग सगळं शांत होतं.


पण एके दिवशी दुपारी माधव शेतावर गेला होता. मुलं शाळेत होती. मृणाल घरातील कामं आवरत होती.


तेवढ्यात तिला एक आवाज ऐकू आला.


कुणीतरी रडत असल्यासारखा.


सुरुवातीला तिला वाटलं, बाहेरून एखाद्या लहान मुलाचा आवाज येत असावा. पण काही क्षणांनी तो पुन्हा ऐकू आला.


यावेळी आवाज घराच्या खालच्या बाजूने येत होता.


मृणाल काही क्षण तिथेच थांबली.


तिने पुन्हा कान देऊन ऐकलं.


आवाज अगदी मंद होता. जणू कुणीतरी हुंदके देत रडत होतं.


ती सावकाश आवाजाच्या दिशेने जाऊ लागली.


वाड्याच्या वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जुन्या जिन्याच्या बाजूला एक अरुंद जिना खाली जात होता. त्याच्या तोंडाशी जाड लाकडी दरवाजा होता.


राहायला आल्यापासून मृणालने त्या दरवाजाकडे कधी विशेष लक्ष दिलं नव्हतं.


आता मात्र तिला आवाज तिथूनच येत असल्याची खात्री वाटत होती.


तिने दरवाज्याजवळ जाऊन कान लावला.


काहीच आवाज नव्हता.


तिने हाताने दरवाजा ढकलला. तो लगेच उघडला नाही. जणू बराच काळ बंद असल्यामुळे लाकूड फुगलं असावं. तिने थोडा जोर लावला.


दरवाजा किरकिरत उघडला.


समोर खाली जाणारा दगडी जिना दिसला.


जुन्या वाड्यातील अंधाऱ्या तळघराकडे जाणारा दगडी जिना.
या अंधाऱ्या जिन्याच्या शेवटी नेमकं काय दडलं होतं? हे जाणून घेण्याची उत्सुकता आणि भीती दोन्ही मनात निर्माण होत होती.



खाली पूर्ण अंधार होता.


मृणालने भिंतीवर हात फिरवत स्विच शोधला. एक जुना स्विच बोर्ड होता. तिने बटण दाबलं, पण दिवा लागला नाही.


तिने मोबाईलची टॉर्च सुरू केली आणि सावकाश पायऱ्या उतरू लागली.


खाली पोहोचल्यावर तिला एक मोठी खोली दिसली.


तळघर बराच काळ बंद असावं. जमिनीवर धुळीचे थर होते. भिंतींवर जाळी पसरली होती. एका बाजूला जुन्या लाकडी पेट्या, काही तुटलेल्या खुर्च्या आणि लोखंडी सामान पडलेलं होतं. खोलीच्या एका कोपऱ्यात मोठी जुनी अलमारी होती.


छताजवळ असलेल्या एका छोट्या वायुवीजनाच्या खिडकीतून थोडासा प्रकाश आत येत होता. मात्र तो इतका कमी होता की खोलीतील वस्तूंच्या फक्त अस्पष्ट आकृत्या दिसत होत्या.


मृणालने पुन्हा आवाज दिला.


"कोण आहे?"


उत्तर आलं नाही.


ती काही पावलं पुढे गेली.


तळघरात एक विचित्र शांतता होती. वरच्या घरातली कोणतीही चाहूल तिथपर्यंत पोहोचत नव्हती.


तिने मोबाईलची टॉर्च खोलीभर फिरवली.


आणि तेवढ्यात तिची नजर त्या जुन्या अलमारीच्या बाजूला गेली.


तिथे कोणीतरी बसलं होतं.


गुडघे छातीशी घेऊन, त्यावर डोकं टेकवून.


अंधारामुळे चेहरा दिसत नव्हता. मात्र लांब केस आणि शरीराची ठेवण पाहून ती एखादी स्त्री असावी असं वाटत होतं.


मृणाल तिथेच थांबली.


"कोण आहे तिथे?"


काहीच उत्तर नाही.


तिने पुन्हा विचारलं.


"अहो, कोण आहात तुम्ही?"


तिच्या आवाजाचा प्रतिध्वनी तळघरात पसरला.


ती आकृती मात्र तशीच बसून होती.


मृणालच्या छातीत धडधड सुरू झाली. हातातील फोन किंचित थरथरू लागला.


तेवढ्यात त्या आकृतीच्या शरीरात हालचाल झाली.


तिने हळूहळू डोकं वर करायला सुरुवात केली.


मृणालची नजर तिथून हलत नव्हती.


अंधारामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. केस चेहऱ्यावर पसरलेले होते. पण त्या केसांच्या मधून दोन डोळे दिसत होते.


अगदी स्पष्ट.


ते डोळे थेट मृणालकडे पाहत होते.


त्या क्षणी मृणालच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली.


तिच्या तोंडातून आवाजही निघेना. हातातील फोन खाली पडता पडता वाचला. पुढच्याच क्षणी ती मागे वळली आणि जिन्याकडे धावली.


पायऱ्या चढताना तिचा पाय घसरला. तरीही कसाबसा तोल सांभाळत ती वर आली. तिने दरवाजा जोरात बंद केला.


काही क्षण ती तिथेच उभी राहिली.


तिचा श्वास वेगाने सुरू होता. कपाळावर घाम जमा झाला होता.


तिने मागे वळून त्या बंद दरवाजाकडे पाहिलं.


आतून कोणताही आवाज येत नव्हता.


---


संध्याकाळी माधव घरी आला तेव्हा मृणालची अवस्था पाहून त्याला आश्चर्य वाटलं.


तिने त्याला तळघरातील सगळा प्रकार सांगितला. त्या स्त्रीचं वर्णन केलं. डोकं वर करताना दिसलेले डोळे आणि स्वतःकडे रोखून पाहणारी ती नजर तिने पुन्हा पुन्हा सांगितली.


माधव शांतपणे ऐकत होता.


"तू एकटी होतीस. इतका मोठा वाडा, कित्येक महिने बंद असलेलं तळघर. आत अंधार, धूळ, जाळी... अशा वातावरणात काहीही विचित्र वाटू शकतं."


"पण मी तिला पाहिलं आहे. ती तिथे बसली होती."


"कदाचित जुनं सामान असेल. प्रकाश कमी होता. तू घाबरलीस, त्यामुळे तुला तसं वाटलं असेल."


मृणालने काही उत्तर दिलं नाही.


माधवने तिला समजावलं. त्याच्या मते जुन्या घरात अनेक प्रकारचे आवाज येणं स्वाभाविक होतं. शिवाय घराची रचना इतकी मोठी होती की आवाज कुठून येतोय हे समजणंही कठीण होतं.


त्याच्या बोलण्याने मृणाल थोडी शांत झाली.


पुढचे काही दिवस कोणताही विचित्र प्रकार घडला नाही.


मात्र सायलीच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवत होता.


ती कधी कधी एकटीच बसून हसत असे. कुणाशी तरी बोलत असल्यासारखी तिची हालचाल असे.


मृणालने एकदा विचारलं.


"काय गं, कोणाशी बोलतेस?"


"कोणाशी नाही."


"मग हसत का होतीस?"


सायलीने काही उत्तर दिलं नाही आणि पुन्हा खेळायला लागली.


मृणालला तिच्या त्या वागण्याचं आश्चर्य वाटलं. पण तिने फारसं मनावर घेतलं नाही.


एकदा माधव शेतातून परत येत असताना त्याची नजर घराच्या आतील जिन्याकडे गेली.


तळघराकडे जाणाऱ्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर एक स्त्री बसलेली होती.


तिची पाठ त्याच्याकडे होती. लांब केस पाठीवर पसरलेले होते.


माधव काही क्षण तिथेच थांबला.


त्याने डोळे चोळून पुन्हा पाहिलं.


पण आता तिथे कोणीच नव्हतं.


त्याला मृणालचा तळघरातील अनुभव आठवला. त्याने तिच्याशी याबद्दल काही बोलण्याचं टाळलं. उगाच ती आणखी घाबरेल, असं त्याला वाटलं.


शिवाय एवढी मोठी मालमत्ता त्याच्या नशिबाने मिळाली होती. शेती होती, वाडा होता. त्याला ती जागा सहज सोडायची नव्हती.


---


मृणालच्या मनात मात्र अस्वस्थता वाढत होती.


वाड्यातील प्रत्येक लहानसहान आवाज आता तिला वेगळाच वाटू लागला होता. रात्री खिडकीबाहेर झाडाची फांदी हलली तरी तिचं लक्ष तिकडे जायचं.


सायलीचं एकटं हसणं, जिन्याच्या दिशेने पाहत राहणं आणि तळघरातील तो अनुभव तिच्या मनातून जात नव्हता.


एके दिवशी दुपारी ती शेजारी राहणाऱ्या कमलाबाईंकडे गेली.


गप्पा मारता मारता विषय वाड्याचा निघाला.


"तुम्ही त्या वाड्याला खूप वर्षांपासून ओळखता ना?" मृणालने सहज विचारलं.


"अगं, माझ्या लग्नापासून पाहतेय तो वाडा. पूर्वी तिथे किती माणसं असायची सांगू? मोठा नोकरचाकरांचा राबता होता."


"रघुनाथराव कसे होते?"


कमलाबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.


"काय सांगू तुला? माणूस फार विचित्रच होता. तापट तर होताच, पण त्याच्या स्वभावाबद्दल गावात फार चांगलं बोललं जात नसे."


मृणाल शांतपणे ऐकत होती.


कमलाबाई पुढे सांगू लागल्या.


"पूर्वी त्या वाड्यात एक घटना घडली होती म्हणे. फार जुनी गोष्ट आहे. आमच्या सासूबाईकडून ऐकलेली."


त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून मृणालच्या चेहऱ्यावरची शांतता नाहीशी झाली.


अनेक वर्षांपूर्वी रघुनाथरावांचा वाडा कायम गजबजलेला असायचा. शेतीसाठी माणसं, घरातील नोकर, पाहुणे अशा अनेकांची ये-जा असे.


रघुनाथरावांचा स्वभाव मात्र दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालला होता.


त्यांची बाहेरगावच्या एका स्त्रीवर नजर होती. ती स्त्री गरीब परिस्थितीत जगत होती. तिचा त्या वाड्याशी किंवा रघुनाथरावांशी कोणताही संबंध नव्हता.


एके दिवशी रघुनाथरावांच्या माणसांनी तिला जबरदस्तीने वाड्यात आणलं.


त्या रात्री तिच्यावर अत्याचार करण्यात आला.


त्यानंतर तिचं काय झालं, याबद्दल कुणालाच निश्चित माहिती नव्हती. काही दिवसांनी ती स्त्री गायब झाल्याचं गावात कळलं. लोकांमध्ये अशी चर्चा होती की तिचा खून करून तिचा मृतदेह कुठेतरी लपवण्यात आला असावा.


पण याचा कोणताही पुरावा कधी मिळाला नाही.


या घटनेनंतर वाड्यात विचित्र प्रकार घडू लागले.


कधी नोकर अचानक काम सोडून निघून जायचे, तर कधी घरातील माणसांना रात्री विचित्र आवाज ऐकू यायचे. काही काळानंतर वाड्यातील एकामागून एक माणसं अपघाती मृत्यू पावू लागली.


कोणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला, तर कोणाचा बैलगाडीच्या अपघातात. काही जण आजारी पडून मरण पावले.


हळूहळू वाड्यातील वर्दळ कमी झाली.


शेवटी रघुनाथराव एकटेच त्या मोठ्या वाड्यात राहू लागले.


कमलाबाईंचं बोलणं संपलं तेव्हा मृणाल काही क्षण शांत बसून राहिली.


तिच्या डोळ्यांसमोर तळघरात बसलेली ती आकृती पुन्हा उभी राहिली.


तिने कमलाबाईंना त्या स्त्रीबद्दल आणखी काही विचारलं, पण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं.


मृणाल तिथून घरी परतली तेव्हा तिच्या मनात एकच विचार होता.


त्या वाड्यात आता एक क्षणही थांबायचं नाही.


---


घरी आल्यावर तिने माधवला सगळं सांगितलं.


वाड्याचा जुना इतिहास ऐकल्यानंतर माधवही काही काळ शांत राहिला.


"मला इथे राहायचं नाही," मृणालने स्पष्ट सांगितलं.


"अगं, लोक काहीही बोलतात. किती वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत त्या. त्याचा आताच्या घराशी काय संबंध?"


"मला काही ऐकायचं नाही. मी स्वतः त्या तळघरात पाहिलं आहे. आत्यानेही पाहिलं आहे. सायलीसुद्धा काहीतरी सांगत असते. तुला हे सगळं सामान्य वाटत असेल, पण मला नाही."


माधवने तिला समजावण्याचा प्रयत्न केला.


त्याने वाडा सोडण्याची घाई करू नये असं सांगितलं. एवढी मोठी जागा, शेती आणि नवीन संसार यासाठी त्याने अनेक योजना आखल्या होत्या.


पण मृणालने मनाशी निर्णय घेतला होता.


"तुम्हाला इथे राहायचं असेल तर राहा. पण मी मुलांना घेऊन इथे राहणार नाही."


तिच्या आवाजातली ठामपणा पाहून माधवला पुढे काही बोलता आलं नाही.


शेवटी त्याने मान्य केलं.


एक-दोन दिवसांत सगळ्या गोष्टींची व्यवस्था करून वाडा सोडायचा, असं ठरलं.


त्या रात्री मृणालने मुलांना जवळ घेतलं. सायली आणि रोहन झोपले होते. माधवही दिवसभराच्या कामामुळे थकला होता.


घरात पुन्हा शांतता पसरली.


---


रात्री किती वाजले होते, हे मृणालला माहीत नव्हतं.


तिची अचानक झोपमोड झाली.


तिने डोळे उघडले. खोलीत अंधार होता. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशामुळे खोलीतील वस्तूंच्या अस्पष्ट सावल्या दिसत होत्या.


तिला काहीतरी जाणवलं.


सायली तिच्या बाजूला नव्हती.


तिने उठून पाहिलं. पलंगाच्या दुसऱ्या बाजूला रोहन झोपला होता. माधवही झोपेत होता.


तिने माधवला हलवलं.


"माधव... उठा."


त्याने डोळे उघडले.


"काय झालं?"


"सायली नाहीये."


माधव लगेच उठून बसला.


दोघांनी खोलीत शोधलं. पलंगाखाली पाहिलं. बाथरूम तपासलं. जवळच्या खोल्यांमध्ये पाहिलं.


पण सायली कुठेच नव्हती.


मृणालचा जीव घाबराघुबरा झाला.


दोघांनी संपूर्ण वाडा शोधायला सुरुवात केली. वरचा मजला, स्वयंपाकघर, दिवाणखाना, अंगण... सगळीकडे पाहिलं.


पण मुलगी सापडत नव्हती.


तेवढ्यात कुठूनतरी आवाज आला.


"आई..."


दोघेही थांबले.


आवाज पुन्हा आला.


"आई...!"


यावेळी तो स्पष्ट होता.


आवाज घराच्या खालच्या बाजूने येत होता.


तळघरातून.


मृणालच्या अंगावर काटाच आला.


"सायली!"


तिने मोठ्याने हाक मारली.


उत्तरादाखल पुन्हा मुलीचा आवाज आला.


"आई... मला बाहेर काढ!"


माधवने मृणालकडे पाहिलं.


दोघांच्या मनात एकच विचार होता.


मुलगी तळघरात होती.

ते दोघे जिन्याच्या दिशेने धावले. तळघराचा दरवाजा बंद होता. माधवने तो उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा सहज उघडला नाही. त्याने जोर लावला.

दरवाजा किरकिरत उघडला.

समोर काळोख होता.

माधवने जवळचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. काहीच उपयोग झाला नाही.

"सायली!"

त्याने पुन्हा हाक मारली.

खालून मुलीचा रडण्याचा आवाज येत होता.

माधवने फोनची टॉर्च सुरू केली आणि दोघेही खाली उतरू लागले.

प्रत्येक पायरीवर त्यांची धडधड वाढत होती.

तळघरात पोहोचल्यावर टॉर्चचा प्रकाश त्यांनी खोलीभर फिरवला.

आणि मग मृणालची नजर जमिनीवर पडलेल्या एका छोट्या आकृतीवर गेली.

"सायली!"

ती धावत तिच्याजवळ गेली.

सायली जमिनीवर बेशुद्ध पडली होती.

मृणालने तिला उचलून छातीशी धरलं.

"सायली... डोळे उघड बाळा..."

मुलगी काहीच बोलत नव्हती.

"चल, आधी बाहेर जाऊया."

माधवने घाईने सांगितलं.

मृणालने मुलीला घट्ट पकडलं आणि दोघे जिन्याकडे वळले.

तेवढ्यात तळघरात कुठेतरी काहीतरी पडल्याचा आवाज झाला.

धाड!

दोघेही थांबले.

माधवने टॉर्च मागच्या बाजूला फिरवली.

काहीच दिसलं नाही.

पुन्हा एक आवाज झाला.

यावेळी तो आवाज अगदी जवळून आल्यासारखा वाटला.

जणू एखाद्या माणसाने हळूच जमिनीवर पाय ठेवला असावा.

माधवने पुन्हा मागे पाहिलं.

अंधारात अलमारीच्या बाजूला कोणीतरी उभं होतं.

एक स्त्री.

तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले होते. शरीरावर फिकट, मळकट वस्त्र होतं. ती अगदी निश्चल उभी होती.

मात्र तिचं डोकं किंचित एका बाजूला झुकलेलं होतं.

आणि तिची नजर थेट त्यांच्यावर होती.

माधवच्या हातातील फोन थरथरला.

मृणालने मागे पाहिलं.

अंधारात अलमारीच्या बाजूला कोणीतरी उभं होतं.

एक स्त्री.

तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले होते. शरीरावर फिकट, मळकट वस्त्र होतं. ती अगदी निश्चल उभी होती.

मात्र तिचं डोकं किंचित एका बाजूला झुकलेलं होतं.

आणि तिची नजर थेट त्यांच्यावर होती.

माधवच्या हातातील फोन थरथरला.

मृणालने मागे पाहिलं.

तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली.

तीच स्त्री!

तीच तळघरात बसलेली स्त्री!

माधवने क्षणाचाही विलंब न करता मृणालचा हात पकडला.

दोघेही जिन्याकडे धावले.

मागून काहीतरी आवाज येत होता. तो आवाज नेमका पावलांचा होता की एखाद्या वस्तूला जमिनीवरून ओढल्याचा, हे समजत नव्हतं.

त्यांनी मागे वळून पाहण्याची हिंमत केली नाही.

जिना चढून वर येताच माधवने मृणालला पुढे केलं. दोघेही वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे धावले.

दरवाजा उघडून ते बाहेर पडले.

रात्रीचं वातावरण शांत होतं. गावाच्या दिशेने जाणारा रस्ता अंधारात हरवला होता. दूरवर एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता.

माधवने सायलीला स्वतःच्या हातात घेतलं. मृणाल त्याच्या बाजूने धावत होती.

दोघेही मागे वळून न पाहता शक्य तितक्या वेगाने वाड्यापासून दूर जात होते.

काही अंतर गेल्यावर मृणालला श्वास घेणंही कठीण झालं. तरीही ती थांबायला तयार नव्हती.

रात्रीच्या अंधारात जुन्या वाड्याच्या दरवाज्यात शांतपणे उभी असलेली लांब केसांची रहस्यमय स्त्री.
मध्यरात्री वाड्याच्या दरवाज्यात उभी असलेली ती स्त्री कोण होती? तिच्या शांत नजरेत एक भयानक रहस्य दडलेलं होतं.


तेवढ्यात तिने नकळत मागे वळून पाहिलं.

वाड्याचा मुख्य दरवाजा उघडा होता.

त्या अंधारलेल्या प्रवेशद्वारात ती उभी होती.

तीच स्त्री.

यावेळी ती अगदी स्पष्ट दिसत होती.

तिचे लांब, विस्कटलेले केस संपूर्ण चेहऱ्यावर पसरलेले होते. अंगावर मळकट पांढरट वस्त्र होतं. तिचा चेहरा काळवंडलेला आणि विकृत दिसत होता.

केसांच्या मधून मात्र तिचे डोळे स्पष्ट दिसत होते.

ते डोळे त्यांच्याकडेच रोखलेले होते.

ती जागची हलत नव्हती.

फक्त त्यांच्याकडे पाहत होती.

मृणालच्या पायांचा वेग पुन्हा वाढला. तिने माधवचा हात घट्ट पकडला.

काही अंतर गेल्यावरही तिला त्या नजरेची जाणीव होत होती.

तिने पुन्हा मागे पाहण्याची हिंमत केली नाही.

त्या रात्री नंतर माधव, मृणाल पुन्हा कधीच त्या वाड्यात परतले नाहीत.

दुसऱ्याच दिवाशी गावात त्यांच्या वाडा सोडून जाण्याची बातमी पसरली.

वाडा पुन्हा एकदा रिकामा झाला.

आणि त्या वाड्याच्या तळघराचा दरवाजा...

तो मात्र अजूनही त्या रात्रीपासून तसाच उघडा होता.

समाप्त.



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें